महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत, माँ आशापुरा माता मंदिरात माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स पूना गणेशखिंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे पाच वाजता सहकुटुंब येणाऱ्या भाविकांना माँ आशापुरा माताच्या आरतीचा लाभ लकी ड्रॉद्वारे मिळणार आहे. तसेच मंदिराच्या प्रांगणात सहकुटुंब पणत्यांचे दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे.
कार्यक्रम समितीकडून मंदिरात दिव्यांच्या पाकिटांची सोय करून देण्यात आली आहे. यावर्षी खास आकर्षण म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि यूके अवॉर्ड विजेते गायक विवेक पांडे आणि प्रितीशा पांडे यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यासह मराठी आणि हिंदी भक्तिमय भजनेही सादर केली जाणार आहेत. यंदा भक्तांसाठी मंदिराची खास सजावट आणि विशेष सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर, संगीतमय वातावरण, आणि फुलांनी सजवलेला परिसर भक्तांना एक आगळावेगळा अनुभव देणार आहे.
सर्वांना शुद्ध वातावरणात दिवाळी साजरी करण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे आणि यंदाच्या दिवाळीला भक्तिमय आणि सांस्कृतिक स्वरूप देण्याचा संकल्प या सोहळ्याच्या माध्यमातून साकारला जात आहे. माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना बुधवार, दि. ३० ऑक्टोबर, पहाटे ५ वाजता या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
