तब्बल १२ तासांनंतर सुखरूप परतली घरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शाळेतून घरी जाण्यासाठी निघालेली एक १० वर्षांची मुलगी घरी पोहोचलीच नाही. तिच्या पालकांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलिसांना याची माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांना ही मुलगी एका बसस्टॉपवर थांबलेली आढळली. या धाग्यावरून पोलीस तिचा शोध घेत थेट आळंदीत पोहोचले. मध्यरात्री दीड वाजता ही मुलगी आळंदीत सापडली.
आईसोबत दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादामुळे मुलगी निघून गेली होती. तिच्या आई-वडिलांनी तिला नेहमी आळंदीतील एका मठात नेले होते. त्यामुळे आळंदीला जाण्याचा मार्ग तिच्या लक्षात होता. तिथल्या मठात जेवण मिळते हेही तिला ठाऊक होते. म्हणून वडिलांसोबत जसे जाते तसेच ती एकटीच गेल्याचे समोर आले.
भारती विद्यापीठ येथील थोरवे शाळेतून दुपारी १२.२० वाजता मुलगी घरी जाण्यासाठी बाहेर पडली होती. पोलिसांनी शाळा तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात एका बसस्टॉपवर मुलगी उभी असल्याचे आढळले. तिच्या वडिलांनी सांगितले की, “आम्ही या बसस्टॉपवरून स्वारगेटला जातो व तेथून बसने आळंदीला जातो.
” या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वारगेट बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा आळंदीला जाणाऱ्या बसस्टॉपवर मुलगी दिसून आली.
त्यावरून पोलिसांनी अंदाज घेत आळंदीला पोहोचून शोध सुरू केला.
मध्यरात्री दीड वाजता मुलगी सुखरूप सापडली. पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
