आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

क्रोधावर विजय ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 23, 2024
Spread the love

पुणे : क्रोध, काम आणि लोभ हे व्यापाऱ्यांसाठी घातक दुर्गुण असून, क्रोधावर विजय मिळवणे ही यशस्वी व्यापारी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी केले. दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे आयोजित “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार २०२४” प्रदान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

हा कार्यक्रम व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मे. गौतम ट्रेडर्स, सोलापूरचे वस्तीमल संकलेचा यांना राज्यस्तरीय पुरस्कार, मे. संगम कलेक्शन, राजगुरूनगर, पुणेचे विजयकुमार भन्साळी यांना पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार, तसेच मे. रामकृष्ण ऑईल मिल, पुणेचे आनंद पटेल यांना पुणे शहरस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याशिवाय दि पूना मर्चंटस् चेंबरचे सभासद मे. पुरणचंद अँड सन्स्, पुणेचे सतीश गुप्ता आणि युवा सभासद मे. आर. बीज् ड्रायफ्रुट, पुणेचे राजीव बाठिया यांना सन्मानित करण्यात आले. आदर्श पत्रकार संजय ऐलवाड यांना कै. वि.ल. गवाडिया पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार ढोलकिया म्हणाले, “व्यापारातील नुकसान हे कधी कधी सर्व प्रयत्नांनंतरही घडते. अशा वेळी ‘ते ईश्वराची इच्छा होती,’ असे मानून पुढे सरकणे गरजेचे आहे. क्रोध हा भूतकाळातील घटना किंवा कृतीवर आधारित असतो. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवून मन आणि बुद्धी शांत ठेवत वाटचाल केली पाहिजे.”

इंडस्ट्रियल मेटल पावडर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश धोका यांनी पुरस्कारार्थींना शुभेच्छा देताना सांगितले, “पुरस्कार हा केलेल्या कामाची पावती आहे. या प्रेरणेने भविष्यात आणखी विधायक काम करण्यात यश मिळेल. समस्यांवर मात करण्यासाठी चेंबरसारख्या संघटनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गुजराथी बंधू समाजाचे प्रसिद्ध उद्योजक राजेश शहा, डॉ. प्रकाश धोका, तसेच पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले.

स्वागत सचिव ईश्वर नहार यांनी केले, तर अध्यक्ष रायकुमार नहार यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. सहसचिव आशिष दुगड यांनी आभार प्रदर्शन केले. माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दि पूना मर्चंटस् चेंबरच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी चेंबरच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण कसे केले जाते, यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाची सांगता सकारात्मक वातावरणात झाली, आणि उपस्थित मान्यवरांनी चेंबरच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.