आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

राखी गुगळेचा दुहेरी विजय : आशियाई योगा स्पर्धेत पुण्याचा झेंडा फडकवला

Spread the love

पुणे : सिंगापूरच्या सेरांगून रोड येथील पीजीपी हॉलमध्ये ६ ते ८ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडलेल्या १०व्या आशियाई योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या राखी गुगळे यांनी दुहेरी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत भारतासह अनेक देशांतील १५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. राखी यांच्या या यशामुळे देशाला अभिमान वाटण्यासारखी कामगिरी घडली आहे.

१७ वर्षांवरील गटातील महिला रिदमिक योगा प्रकारात राखी गुगळे यांनी अप्रतिम सादरीकरण करत रौप्यपदक पटकावले. याशिवाय, ३५ वर्षांवरील पारंपरिक योगा प्रकारात त्यांनी चौथे स्थान मिळवून उत्कृष्टतेचा ठसा उमटवला.

या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतीय संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले, तर व्हिएतनाम, सिंगापूर, हॉंगकॉंग, आणि मलेशिया यांनी अनुक्रमे स्थान मिळवले. राखी गुगळे यांच्या नेतृत्वाने पुणे शहराचा नावलौकिक उंचावला आहे.

राष्ट्रीय योग प्रशिक्षक पांगारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राखी यांनी आपले कौशल्य दाखवून योग क्षेत्रात अपार यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच राखी यांनी योगाच्या विविध प्रकारांमध्ये परिपूर्णता साधली.

पुण्यात परतल्यानंतर भाजप नेते आणि कैबिनेट मंत्री आशिष शेलार तसेच हेमंत लेले यांच्या हस्ते राखी गुगळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पुणेकरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राखी गुगळे यांचे यश योग क्षेत्रातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहे.