९ वर्षांनी मोठ्या तरुणीबरोबर मजा करण्यासाठी केली चोरी : आंबेगावमधील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्यापेक्षा ९ वर्षांनी मोठ्या तरुणीच्या सांगण्यावरून मजा करण्यासाठी १५ वर्षाच्या मुलाने आपल्याच घरातून आजीची १ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची मोहनमाळ चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत आंबेगाव येथील एका ५४ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांचाच १५ वर्षाचा मुलगा व एका २४ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ११ जानेवारी रोजी साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या १५ वर्षांच्या मुलाला आणि आरोपी तरुणीला टॅटू काढण्याच्या निमित्ताने ओळख झाली. पुढे त्यांच्यात मैत्री झाली. तरुणीने “मी घरातून पैसे घेऊन येते, तू पण आण,” असे सांगितले.
त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने घरातील कपाटातून आजीची १ लाख ४० हजार रुपयांची साडेतीन तोळे वजनाची तीन पदरी सोन्याची मोहनमाळ चोरली आणि ती तरुणीला आणून दिली. तिने दुसऱ्या एका तरुणाला सांगितले की, या मुलाची आई आजारी आहे, आणि त्याच्या मोहनमाळ विकायला लावली. त्याचे आलेले पैसेही तरुणी आणि फिर्यादीचा मुलगा यांनी घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.

















