हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्या राजीनाम्याची राजेंद्र चोपडा यांनी केली मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : हिंद सेवा मंडळ ही अत्यंत मोठी व नावाजलेली शैक्षणिक संस्था असून तिच्या श्रीरामपूर येथील दादा वामन जोशी प्रशाला येथे घडलेला प्रकार संस्थेच्या वैभवाला कलंक लावणारा आहे. संस्थेच्या या भोंगळ कारभारामुळे नैतिकतेच्या दृष्टीकोनातून संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जैन ओसवाल पंचायत समाज संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी केली आहे. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक आणि सचिव संजय जोशी यांना पत्राद्वारे राजेंद्र चोपडा यांनी ही मागणी केली आहे.
राजेंद्र चोपडा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्रीरामपूर येथील दादा वामन जोशी प्रशालेतील दुसऱ्या इयत्तेतील ८ वर्षांच्या विद्यार्थीनीवर संस्थेतील शिक्षक सचिन महाजन गोणारकर याने लैंगिक अत्याचार केला आहे. याबाबत पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंद सेवा मंडळ व त्याचे पदाधिकारी किती उदासीन होते, हेच निदर्शनास येते.
पालकांनी तक्रार केल्यानंतर या शिक्षकावर कारवाई करून त्याची बदली करू, एवढेच सांगून त्यांना आश्वस्त करण्यात आले. त्याबरोबरच आपण याबाबत अधिक आग्रह धरल्यास आपल्यावरच गुन्हा दाखल करू, अशा प्रकारची धमकी संस्था प्रशासनाकडून देण्यात आल्याचे समजते. शाळेतील मुलांबाबत हिंद सेवा मंडळ किती काळजी घेते, हे यावरून स्पष्ट होते.
सचिन महाजन गोणारकर याच्याबाबत मिळत असलेली माहिती हिंद सेवा मंडळाची प्रतिमा डागाळणारी आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असून, शासकीय पवित्र पोर्टलवरून आलेल्या पाच उमेदवारांमधून त्याची निवड करून संस्थेत नियुक्ती करण्यात आली.
त्यासाठी मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. याच सचिन मुळे यांना सेवा ज्येष्ठता यादीतील जवळपास १५ शिक्षकांची पदोन्नती डावलून, त्यांना दमदाटी करून त्यांची ना हरकत प्रमाणपत्रे घेऊन सचिवांनी त्यांना मुख्याध्यापक पदावर बसविले असल्याचे समजते. सचिन मुळे हे मानद सचिवांचे नातेवाईक असल्याचेही समजते.
१०० वर्षांचा दैदिप्यमान इतिहास असलेल्या हिंद सेवा मंडळ या संस्थेतील सिताराम सारडा विद्यालयात झालेला शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी खून, अकोले येथील अपंग शिक्षिकेचा झालेला विनयभंगाचा प्रकार, संस्थेत पैशांसाठी होत असलेला भ्रष्टाचार आणि आता श्रीरामपूरमधील लैंगिक अत्याचार अशा घटना घडत असताना संस्थेचे पदाधिकारी मात्र खुर्ची उबवत पैशाचेच काम करीत असल्याचा आरोप राजेंद्र चोपडा यांनी पत्रात केला आहे.
या सर्व घटना पाहता हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक व सचिव संजय जोशी यांनी आपली जबाबदारी पार न पाडल्याने नैतिकतेच्या दृष्टीकोनातून आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी चोपडा यांनी या पत्रातून केली आहे.















