वाहनचालक परवाना नसलेल्या १९ वर्षाच्या तरुणाचे कृत्य
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाहनचालक परवाना नसताना पहाटेच्या वेळी टिळक रोडवरून भरधाव जाणाऱ्या १९ वर्षाच्या तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अत्यंत वेगाने ही कार विरुद्ध बाजूच्या फुटपाथवर चढून दुकानाच्या शटरला धडकली. ही धडक इतकी वेगाने झाली की दुकानाचे शटर तुटले. आतील काचा फोटल्या आणि दुकानातील २८ फ्रीजचे एकूण ११ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत मनमितसिंग हरबनसिंग छाबरा (वय ४७, रा. विद्यासागर कॉलनी, सॅलसबॅरी पार्क) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शिवपुत्र कमलाकर बेळ (वय १९, रा. काळेपडळ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक या दुकानात रविवारी पहाटे सव्वा तीन वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुत्र बेळ हा कार घेऊन वेगाने अलका चित्रपटगृहाकडून टिळक रोडने स. प. महाविद्यालयाकडे जात होता.
पहाटेच्या वेळी रोडवर कोणी नसल्याने हा प्रचंड वेगाने कार चालवत साहित्य परिषद चौकात आला. त्याचवेळी बाजूच्या रोडवरून एक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि ती फुटपाथवर चढून थेट दुकानाच्या शटरला धडकली.
ही धडक इतकी जोरात होती की शटरला धडकल्यानंतर कार काटमोनात उलटी फिरली. या धडकेत दुकानाचे शटर पूर्णपणे तुटले. त्यात शटरनंतर लावलेल्या दोन काचा फुटल्या. आतमध्ये शेजारी शेजारी ठेवलेले २८ फ्रीज, टेबलावरील लॅपटॉप असे तब्बल ११ लाख ५२ हजार १२० रुपयांचे नुकसान झाले. विश्रामबाग पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

















