आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अध्यात्मिक विचार, संस्कारमूल्ये हीच भारताची खरी ओळख

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Other, People • January 27, 2025
Spread the love

पुणे : “भारत हा राज्यांचा समूह आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल, असा निर्णय २६ जानेवारीला झाला. प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे महत्व, त्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने राष्ट्राप्रती प्रेमभाव, समर्पण आणि विकासात योगदानाची भूमिका निभावली पाहिजे,” असे प्रतिपादन ब्रिगेडिअर (नि.) बी. एल. पुनिया यांनी केले. अध्यात्मिक विचार, संस्कारमूल्ये हीच भारताची खरी ओळख असल्याचे बी. के. डॉ. सुनीता दीदी यांनी नमूद केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडिअर पुनिया व डॉ. सुनीता दीदी बोलत होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत गायन झाले.

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या मुलांनी संचलन केले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत राष्ट्रभक्तीची गाणी सादर केली. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा धायगुडे, ग्रीष्म सुराणा, आख्या अभिमन्यू व चिन्मय सूल यांनी सूत्रसंचालन केले.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला. प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, बीके मंगलादीदी, पोलीस अधिकारी प्रशांत महाले, मनोज राठोड, सूर्यदत्तचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. स्नेहल नवलखा यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

बीके डॉ. सुनीता दीदी म्हणाल्या, “देशाच्या विकासात आपण प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. भारतमातेने सर्वांना आजवर भरभरून दिले आहे. आपणही भारतमातेकडून हा संदेश घेत ‘सोने की चिडिया’ अशी ओळख असलेल्या भारताला पुन्हा ते वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. आपल्या प्रत्येकाच्या योगदानातून भारत विश्वगुरू बनणार आहे.”

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारताला २०४७ मध्ये विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. मूल्ये, संस्कार, तंत्रज्ञान आणि परस्पर सहकार्य यातून हे ध्येय गाठता येईल. सर्वांगीण विकासाचे कौशल्याधारित शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’चा भर राहिला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सेना आणि आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन अनमोल आहे.”