आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भगवान महावीरांचे विचार जागतिक शांततेसाठी महत्त्वाचे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • February 4, 2025
Spread the love

मुंबई : भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान व विचार हे सर्वकालीन प्रभावी असून, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, अचौर्य, अनेकांतवाद ही त्यांची तत्त्वे जागतिक शांततेसाठी आज अत्यंत महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे भगवान महावीर स्वामी 2550 वा निर्वाण कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी भगवान महावीरांच्या जीवन चरित्रावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी, आमदार चैनसुख संचेती, समितीचे संयोजक हितेंद्र मोता या मान्यवरांच्या उपस्थितीत राजभवनच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये संपन्न झालेल्या या समारंभास राज्यभरातून आलेले जैन समाजाचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व नवकार मंत्राच्या पठनाने सुरू झालेल्या कार्यक्रमाचे राज्यपालांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. समितीचे संयोजक हितेंद्र मोता यांनी स्पर्धा आयोजनामागचा उद्देश व संकल्पना आपल्या प्रास्ताविकातून विशद केली. मंत्री लोढा व आमदार चैनसुख संचेती यांनी भगवान महावीरांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.

जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या स्पर्धेत राज्यभरातील दहा हजाराहून अधिक शाळा व 16 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगून, आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कमेच्या पुरस्काराद्वारे विद्यार्थ्यांना गौरविण्यात आल्याचे सांगितले. एकूण 25 लाख रुपयांचे पुरस्कार वितरीत केल्याची माहिती दिली.

या राज्यव्यापी भव्य आयोजनाच्या यशस्वितेसाठी निमंत्रित सदस्य संदीप भंडारी यांच्यासह शासकीय जिल्हा समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळेच हे आयोजन यशस्वी झाल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.

सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होण्यामध्ये नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक व नागपूर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्राथमिक विभागातील राज्यातून प्रथम आलेल्या गुंज निलेश सेठीया यांना 3 लाख 33 हजार रुपये, द्वितीय आलेल्या स्वास्ती जिनेश काला यांना 2 लाख 22 हजार रुपये, तृतीय आलेल्या श्रीशा प्रसाद सोनवणे यांना 1 लाख 11 हजार रुपये तसेच माध्यमिक विभागातील राज्यातून प्रथम आलेल्या आराध्या पारस लोढा यांना 4 लाख 44 हजार रुपये, अक्षय एकनाथ ढेरे यांना 2 लाख 22 हजार रुपये, शर्वरी प्रज्ञान भोजनकर यांना 1 लाख 11 हजार रुपये पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त 10 विशिष्ट निबंध, 5 सर्वोत्तम शाळा यांचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी व आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते जिल्हा समिती सदस्यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जिल्हास्तरावरील प्रथम 10 विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण समारंभ त्या त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.