भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त स्वानंद महिला संस्था आणि जैन कॉन्फरन्स महिला शाखेचा सन्मान सोहळा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : स्वानंद महिला संस्था आणि श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा (महिला विभाग) यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव २०२५ निमित्त समाजसेवा, संस्कार आणि कार्यक्षमतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात जीवनबाई झुंबरलाल कांकरिया यांना माता त्रिशला माई रमा पुरस्कार, खिवराज व सुशीलाबाई मुथा यांना राजा सिद्धार्थ माता त्रिशला पुरस्कार, तर अंजली शहा यांना स्वानंद क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन्मानप्राप्त जीवनबाई कांकरिया यांचा पुत्र भवरीलाल कांकरिया यांनी सत्काराला उत्तर देताना ९३ वर्षीय मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्कार, सेवाभाव आणि समाज उपयोगी कार्यासाठी स्वानंद महिला संस्था आणि जैन कॉन्फरन्स करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
सुशीलाबाई मुथा म्हणाल्या, “संस्कार आणि संस्कृतीचे जतन करणे हेच आमचे कर्तव्य आहे, आणि तीच शिकवण आमची मुले पुढे नेत आहेत.” कथाकथनात विशेष योगदान देणाऱ्या अंजली शहा यांचा देखील या वेळी सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यावेळी डॉ. अशोककुमार पगारिया (राष्ट्रीय उपाध्यक्ष), नितीन बेदमुथा (पंचम झोन अध्यक्ष), प्राचार्य प्रकाश कटारिया, संदेश गदिया आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर मातोश्री आश्रम येथे ज्येष्ठांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी श्रेयांस पगारिया यांनी “विसरू नको रे आईबापाला” ही भावस्पर्शी कविता सादर केली. स्वानंद संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी कथाकथन, कविता, काव्यपंक्ती आणि गीते यांद्वारे कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात फिरोज मुजावर यांनी सादर केलेल्या गणेश वंदना कथकनृत्याने झाली. या वेळी गोडसे सर व त्यांच्या कन्या संस्कृती गोडसे यांच्या सामाजिक सेवाभावाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी रागाने सांगता करण्यात आली.
