महिलांना वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या पापा भैय्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल : कुंटणखानाचालकास अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आणखी ४ महिला व एक पुरुष असे ५ बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे आढळून आले आहे. फरासखाना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ब्युटी पार्लर व टेलरिंगचे काम देण्याच्या नावाखाली बांगलादेशातून पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावणाऱ्या पापा शेख याच्यासह ४ जणांवर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
बांगलादेशी एजंट मुल्ला, बाबू भैय्या उर्फ पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (वय २६, रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ), घरमालकीण मीनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
कुंटणखाना चालक भोपसिंग राजपूत याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गंगाधर जावळगी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला.
त्यात पहिल्या मजल्यावर मुळच्या बांगलादेशातील चार महिला व एक पुरुष आढळून आले. भोपसिंग राजपूत हा कुंटणखाना चालवत होता. तो या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. ग्राहकांकडून मिळालेले पैसे स्वतःकडे ठेवत होता. घरमालकीण मीनाक्षी मेत्री हिला तो काही पैसे देत होता.
या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांना ब्युटी पार्लरमध्ये किंवा टेलरिंगच्या कामात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन बांगलादेशी एजंट मुल्ला याने पुण्यात आणून पापा शेख याच्या हवाली केले होते. त्याने जबरदस्तीने आणि पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.
त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांच्या म्हणण्यानुसार काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, चंद्रकांत जावळगी, सहायक पोलीस फौजदार खराडे, पोलीस अंमलदार सुनील मोरे, महेश राठोड, नितीन जाधव, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, विशाल शिंदे, चेतन होळकर, पुंडलिक जुबंड, सुमित खुट्टे, राजश्री मोहिते, काळे, खुंटे, भोईटे, बेंद्रे यांनी केली.
पुण्यातून ७० बांगलादेशींची मायदेशात रवानगी – गेल्या काही महिन्यांमध्ये शहर पोलिसांनी बुधवार पेठेमध्ये किमान दोन वेळा नाकाबंदी करून बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम राबविली होती. त्यात बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या किमान १२ महिला आढळून आल्या होत्या. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी जुलै २०२५ मध्ये परिमंडळ १ चा पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत भारतात अनधिकृतपणे राहणाऱ्या ७० बांगलादेशी महिला व पुरुषांवर विविध कारवाया करून त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.















