डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
आकुर्डी : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे “शौर्यरंग २०२६” या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अयुधा, अग्नी, गरुडा, छावा, रुद्रांश, योद्धा आणि ध्रुवा या प्रेरणादायी नावांच्या संघांनी आपापल्या ध्वजासह शिस्तबद्ध पतसंचलन केले. यावेळी शौर्यरंग फलक व जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
या क्रीडा सप्ताहात कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) या अंतर्गत क्रीडा प्रकारांसह क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, थ्रोबॉल, रिले शर्यत आणि रस्सीखेच या बाह्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले.
उद्घाटन प्रसंगी संकुलाचे मुख्य वित्तीय अधिकारी बिपिन शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी मैदानी खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, तर अंतर्गत खेळ मानसिक ताकद आणि एकाग्रता वाढवतात, असे सांगितले.
तसेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आकुर्डीचे प्राचार्य डॉ. संजीव देशपांडे यांनी विजय आणि पराभव हे क्रीडाक्षेत्रातील दोन महत्त्वाचे पैलू असून त्यातून शिकण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन केले. संकुल संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागप्रमुख डॉ. संकेत कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्रा. आरती पाटील व डॉ. अनिकेत गरुड यांनी सहकार्य केले. तसेच वैभव पाटील, सुदर्शन कुंभार, अभिजीत इनामदार आणि विद्यार्थी क्रीडा प्रमुख कृष्णा म्हसे, ऋतेश तळे, अथर्व सोनवणे, सानिका सरोदे, पियुष साळुंखे, नकुल सूर्यवंशी, श्रीराज पाटील व आयुष वाघ यांनी मोलाचे सहकार्य केले.















