२८ लाखांच्या बनावट नोटा जप्त : बँकेत बनावट नोटा जमा झाल्याने उघडकीस आला प्रकार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यावरून बनावट नोटा छापणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २८ लाखांच्या ५०० व २०० रुपये दराच्या नोटा जप्त केल्या आहेत. तसेच नोटा छापण्याचे मशीन व साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय ३५, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय ३४, रा. मोरया गोसावी, केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (वय ३५, रा. गहुंजे), नरेश भिमप्पा शेट्टी (वय ४२, रा. लोहगाव), प्रभू लक्ष्मण गुगलजेड्डी (वय ३८, रा. विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये १७ एप्रिल रोजी २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना, बँकेत कोणत्या खात्यातून ही रक्कम भरली गेली, तेथून तपासाला सुरुवात झाली.
खातेधारकाने या नोटा खऱ्या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. पोलिसांनी मनीषा ठाणेकर हिला ताब्यात घेतल्यानंतर टोळीचा पर्दाफाश झाला.
मनीषा ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याचे काम करते. तिच्याकडून पोलिसांनी २०० रुपयांच्या १०० बनावट नोटा जप्त केल्या. तिच्याकडे केलेल्या चौकशीत भारती गावंड हिचे नाव पुढे आले. तिच्याकडून पोलिसांनी २०० रुपयांच्या ३०० नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत सचिन यमगरला पकडण्यात आले.
या तिघांना कोल्हे नावाच्या व्यक्तीने या बनावट नोटा दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात ‘कोल्हे’ हे नाव धारण करून शेट्टी वावरत असल्याचे उघड झाले. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकला असता, घरामध्ये ४ लाख रुपयांच्या २०० रुपये दराच्या बनावट नोटांचे २० बंडल, २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा, नोटा छापण्याचे प्रिंटर, ५०० रुपये दराच्या ए ४ साईजच्या १,११६ कागदांवर प्रत्येक कागदावर ४ नोटा अशा एकूण २,२३२ प्रिंट केलेल्या नोटा हस्तगत करण्यात आल्या.
त्यांचे बाजारमूल्य २२ लाख ३२ हजार रुपये इतके आहे. त्याचबरोबर नोटा प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. नरेश शेट्टी याच्याकडे केलेल्या तपासात त्याला मदत करणाऱ्या प्रभू गुगलजेड्डी याला तांत्रिक विश्लेषणावरून अटक करण्यात आली.
त्याच्याकडून २०० रुपये दराच्या ३,००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यातील नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप, मालक व इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख यांनी केली आहे.















