NEET SS परीक्षेत राष्ट्रपातळीवर १७९३ वी रँक मिळवून बार्शीचे नाव उज्ज्वल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी शहराचा नावलौकिक उंचावणारी आणि प्रत्येक युवकाला प्रेरणा देणारी आनंददायक बातमी, बार्शीचे सुपुत्र डॉ. सारंग शरद खडके यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत २०२४-२५ च्या NEET SS (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत राष्ट्रपातळीवर १७९३ वी मेरिट रँक मिळवली आहे. त्यांच्या या दमदार झेपेचे सर्वत्र कौतुक होत आहे, आणि शहरात अभिमानाची लहर उसळली आहे.
डॉ. सारंग यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. सुलाखे हायस्कूल, बार्शी येथून शालेय शिक्षण घेतलेल्या डॉ. सारंग यांनी NEET UG परीक्षेत महाराष्ट्रात १३८ वा राज्य क्रमांक मिळवून वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात केली.
यानंतर त्यांनी मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटल येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. पुढे NEET PG परीक्षेत AIR 6258 मिळवून त्यांनी वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथून DNB (Medicine) ही पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
डॉ. सारंग यांचा पुढील उद्देश गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या अत्यंत महत्त्वाच्या सुपर स्पेशालिटी क्षेत्रात संशोधन व सेवा देण्याचा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बार्शीच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. बार्शीकरांच्या वतीने डॉ. सारंग खडके यांना पुढील शिक्षण, संशोधन आणि यशस्वी वैद्यकीय कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक आशीर्वाद.
