कोंढवा पोलिसांची कारवाई : एक वर्षासाठी नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. आकाश ऊर्फ मोन्या बाळासाहेब गायकवाड (वय २४, रा. राम मंदिराजवळ, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे.
आकाश गायकवाड हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लोकांना दुखापत करणे, दंगा, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हे केले आहेत. कोंढवा परिसरात त्याची दहशत आहे. त्यामुळे कोंढवा पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून आकाश गायकवाड याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. ही कारवाई सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शोख, नवनाथ जगताप, पोलीस उपनिरीक्षक स्रेहल जाधव, पोलीस अंमलदार चव्हाण, कोकाटे, आत्तार, एकोर्गे यांनी सबळ पुरावे गोळा करून प्रस्ताव तयार केला होता.
