ट्रकचालकाला अडवून दंडाची भीती दाखवून लुटणारा पोलीस अंमलदार निलंबित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील अवैध धंद्यांना संरक्षण देऊन त्यांना पाठबळ देणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करून सर्वांना एक मोठा धडा दिला आहे.
हुक्का बारच्या अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या काळे पडळ पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.
शरद निवृत्ती नवले असे या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मोहम्मदवाडी येथील बीबीसी रूफटॉप किचन अँड बार येथील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळे पडळ पोलिसांनी कारवाई केली होती. या हॉटेलचे मालक पार्थ अनिल वाल्हेकर यांनी चौकशीत सांगितले की, एप्रिल २०२५ मध्ये हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात केली होती.
त्याबाबत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद नवले यांच्याशी बोलणे झाले होते. त्यांनी हुक्का बार सुरू केल्याबद्दल ‘गुडलक’चे ३० हजार आणि एप्रिल महिन्याचे ३० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये १० एप्रिल २०२५ रोजी रोख स्वीकारले होते.
यानंतर त्यांच्या ओळखीचे हनुमंत गायकवाड पाटील यांनी हॉटेल मालकाला १२ मे रोजी फोन करून नवले यांनी ३० हजार रुपये पाठविण्यास सांगितल्याचे सांगितले. त्यांच्यामार्फत ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारले.
शरद नवले यांनी हॉटेल मालकाला बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात त्याच्याकडून एकूण ९० हजार रुपये स्वीकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्यामुळे शरद नवले यांना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.
कारवाईची भीती दाखवून लुबाडले दुसऱ्या कारवाईत सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी निलंबित केले आहे.
बापूराव पोपट ढोले असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी पाठवलेल्या अहवालावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस अंमलदार ढोले यांनी १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर बोगदा पार करून सातारा बाजूला जाताना कारमधून जाऊन एका ट्रकला अडवले.
ट्रकचालक राहुल कुमार शिवनाथ यादव (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना ‘‘आप फोन पे बात कर रहे हैं, उसका चलान १५ हजार रुपये है,’’ असे म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी ट्रकचालकाला स्वतःच्या गाडीत बसवले.
ट्रकचालकाने ‘‘माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, बँक खात्यात १० हजार रुपये आहेत,’’ असे सांगितल्यावर त्यांनी ट्रकचालकाला खेड शिवापूर येथील एका पेट्रोल पंपावर नेले. तेथील कर्मचार्याला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.
परंतु, त्या कर्मचार्याने रोख पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी ट्रकचालकाला एका गॉगल स्टॉलच्या दुकानात नेले आणि तेथील दुकानदाराकडून ऑनलाईन पैसे घेऊन १० हजार रुपये रोख घेतले.
ट्रकचालक राहुल यादव यांनी याबाबत तक्रार केली. त्याची चौकशी करण्यासाठी ढोले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी ट्रकचालकाची माफी मागून १० हजार रुपये परत दिले
याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी रिपोर्ट पाठवला.
पोलीस दलाच्या कर्तव्याशी प्रतारणा करणारे, अत्यंत गलिच्छ आणि भ्रष्टाचारास पोषक कृत्य केल्यामुळे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ढोले यांना निलंबित केले आहे. एकाच दिवशी दोघांना निलंबित करण्यात आले.
