आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाहनांच्या नंबरप्लेटसाठी अंतिम मुदतवाढ

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider) • June 21, 2025
Spread the love

राज्य परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार, वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी यापूर्वी ३० मार्च, नंतर ३० एप्रिल आणि त्यानंतर ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत फक्त ३० टक्के वाहनांनाच नंबरप्लेट बसवता आल्या असल्यामुळे ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे.

राज्यातील वाहनधारकांकडून अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि ऑनलाइन नोंदणी व नंबरप्लेट वितरण प्रक्रियेत अडथळे येत असल्यामुळे नंबरप्लेट बसवण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे राज्य परिवहन विभागाने आता १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देत ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट केले आहे.

फक्त पुणे शहरातच २६ लाखांपेक्षा अधिक पात्र वाहने आहेत, त्यापैकी सुमारे ४ लाख वाहनांनाच आजपर्यंत HSRP प्लेट बसवता आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर नंबरप्लेट बसवण्याची गती वाढवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.

“सर्व जुन्या वाहनधारकांनी १५ ऑगस्टपूर्वी नवीन नंबरप्लेट लावणे बंधनकारक आहे. ही शेवटची मुदतवाढ आहे, त्यानंतर कारवाई केली जाईल,” विवेक भीमनवार – परिवहन आयुक्त