वॉचमनने वाचविले प्राण : पतीसह ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : २५ लाख रुपये खर्च करुन लग्न लावून दिल्यानंतरही वेळोवेळी आई वडिलाने जावयाला ५० लाख रुपये दिले. तरीही पतीने वेळोवेळी मारहाण करुन विवाहितेला बिल्डिंगचे गॅलरीतून ढकलून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा ऐकून वॉचमनने धावत येऊन तिला वाचविले. चंदननगर पोलिसांनी पतीसह ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पतीसह सासु सासरे फरार झाले आहेत.
पती प्रणिल निकुडे (वय ३२), सासरे उदय निकुडे (वय ६०), सासु वैशाली निकुडे (वय ५५), दीर प्रतिक निकुडे (वय ३०, सर्व रा. सिलिकॉन बे, वडगाव शेरी), दीर प्रमोद माणिक निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) चुलत सासरे माणिक जगन्नाथ निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत २४ वर्षाच्या विवाहितेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार आॅक्टोंबर २०२३ ते २५ जून २०२५ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिचे पती उदय निकुडे याचा फ्रोजन फुडचा व्यवसाय आहे.
दोन्ही कुटुंबाच्या ओळखीने फिर्यादी यांचा उदय निकुडे याच्याबरोबर ७ एप्रिल २०२३ रोजी विवाह झाला़ वडिलांनी साडेसात लाख रुपये रोख, सर्व संसारोपयोगी वस्तू, सोन्याची अंगठी देऊन एकूण २५ लाख रुपये खर्च करुन लग्न करुन दिले. सुरुवातीला सहा महिने व्यवस्थित गेले. त्यानंतर ते वडगाव शेरीतील सिलिकॉन बे मध्ये रहायला आले.
८ एप्रिल २०२४ रोजी फिर्यादी यांनी रिक्षाला पैसे मागितल्याच्या कारणावरुन उदय याने फिर्यादी यांना मारहाण केली. त्यांच्या छातीला सुज आली होती. परंतु, हॉस्पिटलमध्ये नेल्यावर पोलीस तक्रार होईल, या भितीने त्यांनी फिर्यादी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाहीत. माझ्या मुलाचे नाव पोलिसांना सांगितले तर तुझ्याकडे बघुन घेईन, अशी सासऱ्यांनी धमकी दिली.
सासरी होणारी मारहाण, छळ असह्य झाल्यावर एक वर्षांनी तिने आईवडिलांना याची माहिती दिली़ तिचा संसार वाचावा, म्हणून तिच्या वडिलांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन सासरकडील लोकांना वेळोवेळी ५० लाख रुपये दिले. परंतु, त्यांच्यात काहीच फरक पडला नाही.
उलट जास्त त्रास देऊ लागले. २७ मे २०२५ रोजी उदय निकुडे याने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट तिने दोन दिवसांनी आईवडिलांना सांगितली. त्यांनी जावई ना उदया सुधारेल, असे म्हणून तिची समजूत काढली.
२५ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता त्या मोमोज ऑर्डर करीत असताना उदय याने तू ऑर्डर करु नको, मी करतो, असे म्हणून भांडणे काढली. तिला शिवीगाळ करुन तिचे डोके कपाटावर आपटले. केस उपटून मारहाण केली. तेव्हा त्या पोलिसांना फोन करण्यासाठी फोन करत असताना उदय याने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेऊन तो फोडला.
त्यानंतर त्यांना उदय याने ओढत गॅलरीत घेऊन गेला़ तेथून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिचे सासु सासरे हे ढकलून दे तिला म्हणजे आपल्या मागची पिडा निघुन जाईल, असे म्हणत होते. तिने मोठमोठ्याने आरडा ओरडा केला. रात्रीच्या वेळी तो आवाज ऐकून सोसायटीचा वॉचमन व सोसायटीतील लोकांनी खालून आवाज दिला.
वॉचमन धावत वर आले. त्यांनी तेथे येऊन तिला वाचवले. वॉचमनने फोन करुन तिच्या वडिलांना बोलावून घेतले. ते रात्री सव्वा बारा वाजता आले आणि आपल्या मुलीला घरी घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर ते कुटुंब फरार झाले असून चंदननगर पोलिसांची तीन पथके त्यांचा शोध घेत आहेत.
