सिंहगड रोड पोलिसांनी चौघांना अटक करून वडगावमध्ये काढली वरात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दोघांवर वार करून कारच्या काचा फोडत दहशत पसरविणाऱ्या चार गुंडांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक करून त्यांची वडगाव परिसरात वरात काढली.
अमन अंबीर झारेकरी (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पूल, सिंहगड रोड), निशांत राजेश राऊत (वय २४, रा. महाडिक चाळ, अप्पर ओटा, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सुमित अनिल माने (वय २२, रा. जिजामाता वसाहत, हडपसर), स्वप्निल चंद्रकांत गायकवाड (वय २०, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वडगाव येथील महालक्ष्मी मंदिरासमोर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पाच ते सहा गुंड आले आणि त्यांनी पांढऱ्या रंगाच्या सुझुकी फ्रॉन्क्स कारच्या काचा फोडल्या. तसेच कारमधील दोघांवर लोखंडी हत्याराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाचे तसेच आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून आरोपी निष्पन्न केले आणि त्यांपैकी चौघांना अटक केली. त्यांनी गुन्हा करताना वापरलेली दुचाकी व तीन लोखंडी हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंखे अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, भूपेश साळुंखे, पोलीस हवालदार अण्णा केकाण, उत्तम तारू, विकास बांदल, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहिते, सतीश मोरे, समीर माळवदकर, ज्ञानेश्वर डाके यांनी केली.















