विकत घेणारी महिला, आईवडील, मध्यस्थांसह ६ जणांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुलं न होणाऱ्या महिलांना समाजात मानाचं स्थान मिळत नाही. त्यातूनच त्या मुलासाठी कोणत्याही थराला जात असतात. पैसे देऊन ४० दिवसांची मुलगी विकत घेणाऱ्या महिलेला आता त्यामुळे अडचणीत यावं लागलं आहे. पोलिसांनी या महिलेसह, मुलीचे आईवडील आणि मध्यस्थ अशा ६ जणांना अटक केली आहे.
मिनल ओंकार सपकाळ (वय ३०, रा. बिबवेवाडी), ओंकार औदुंबर सपकाळ (वय २९, रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (वय २७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय ३४, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (वय ४४, रा. येरवडा), दीपाली विकास फटांगरे (वय ३२, रा. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनल सपकाळ यांना पहिल्या पतीपासून एक पाच वर्षांचा मुलगा आहे. सध्या त्या ओंकार सपकाळ यांच्यासोबत राहत असून, त्यांना २५ जून २०२५ रोजी एक मुलगी झाली. या मुलीच्या बदल्यात ‘साडेतीन लाख रुपये देतो’ अशी लालच मध्यस्थांनी दिली. त्यांनी ही ४० दिवसांची मुलगी दीपाली फटांगरे हिला दिली. त्याबदल्यात मध्यस्थांमार्फत दोन लाख रुपये मुलीच्या आईवडिलांना दिले गेले.
मात्र, मध्यस्थांना अधिक रक्कम मिळाली असून आपल्याला कमी पैसे मिळाले, असा संशय सपकाळ दाम्पत्याला आला. त्यांनी अधिक पैसे मागितले. त्यावरून वाद निर्माण झाला. या वादानंतर सपकाळ यांनी येरवडा पोलिसांकडे जाऊन ‘आमची मुलगी पळवून नेली’ अशी माहिती दिली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मध्यस्थ व मुलीला विकत घेणाऱ्या दीपाली फटांगरे हिला ताब्यात घेतले. वेगळी चौकशी केली असता, वेगळाच प्रकार समोर आला. या बालिकेला पळवून नेले गेले नव्हते, तर तिच्या आईवडिलांनीच तिला विकले होते, हे वास्तव उघड झाले.
दीपाली फटांगरे हिला कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न पार पाडता साडेतीन लाख रुपयांच्या मोबदल्यात सपकाळ दाम्पत्याने बालिका विकली असून, या प्रकारात संगनमत व सहाय्य करून मानवी अपव्यापाराचा गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके करत आहेत.
