गृहमंत्री अमित शहा : जयराज स्पोर्ट्स अॅण्ड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत चंद्रयान मोहिमेपासून स्टार्ट अपपर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, खेळापासून संशोधनापर्यंत अशा सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत असून २०४७ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीमध्ये भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
व्यापार आणि उद्योगाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या गुजराती बांधवांनी एकत्र येऊन सर्व पुणेकरांसाठी उभारलेल्या श्री पूना गुजराती बंधू समाजच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन दि. ०४ जुलै २०२५ गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कोंढवा बुद्रूक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष नितीन देसाई, जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरचे कार्यकारी संचालक राजेश शहा , नैनेश नंदू, जयंत शहा, राजेंद्र शहा, वल्लभ पटेल, सुजय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, गेल्या ११ वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद आणि दहशतवादाचा टप्प्याटप्प्याने बिमोड करण्यात आला असून २०४७ च्या भारताचा पाया १४० कोटी जनतेच्या सोबतीने रचला जात आहे.
एक देश दोन झेंडे नाकारत काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय असो किंवा साडेपाचशे वर्षांहून अधिक काळ बंदिस्त असलेल्या रामलल्लाला सन्मानपूर्वक स्थापित करण्याची कृती असो, या सर्वांमधून नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व वारंवार सिद्ध होत आहे.
जगाच्या नकाशावर भारत आशावादी देश म्हणून उदयास येत आहे. २०३६ मध्ये भारतात ऑलिंपक स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असून त्यामध्ये पहिल्या दहा बक्षीसांवर भारत आपली मोहोर उमटवेल, यादृष्टीने आखणी सुरू आहे.
नरेंद्र मोदी सरकारने देशात अमूलाग्र बदल आणि परिवर्तन घडवून आणले असून वीज, शौचालये, आरोग्य यासारख्या मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या समाजाच्या जीवनात प्रकाश पेरण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले.
पुण्यभूमीत अडीच लाख चौरस फुटांची देखणी आणि सुसज्ज वास्तू गुजराती समाजाच्या एकोप्यातून उभी राहिली, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. कोणत्याही सामाजिक भवनात अशा प्रकारच्या सोयीसुविधा असलेली ही पहिलीच वास्तू म्हणावी लागेल.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकल्पाचे उद्घाटन करतात, त्या प्रकल्पाची भरभराट होते, हा आजवरचा इतिहास आहे. मोदींनी भूमिपूजन केलेल्या आणि अमित शहा यांनी लोकार्पण केलेल्या श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटर या प्रकल्पाचे भविष्य उज्ज्वल आहे.
कोणत्याही शहराला बाजारपेठेशिवाय शोभा नसते. गुजराती समाजाने शहरांमध्ये बाजारपेठा प्रस्थापित करून शहरांना शोभा आणली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राष्ट्रहीत अग्रभागी ठेवून राष्ट्रहिताच्या आड येणाऱ्या आव्हानांचे संधीत रूपांतर करून देश प्रगतीपथावर नेला.
नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि अमित शहा यांच्या कुशल रणनितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताची दखल गांभीर्याने घेतली जात आहे. महाराष्ट्राच्या विकासात गुजराती समाजाचे मोठे योगदान असून महाराष्ट्राच्या संस्कृतीत गुजराती समाज समरस आणि एकरूप होऊन गेला आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गुजराती समाजामुळे महाराष्ट्राची तिजोरी सशक्त होत आहे. गुजराती समाज हा व्यापाराच्या माध्यमातून केवळ पैसा कमवत नाही, तर आपले समाजाचे ऋण लक्षात घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.
कोविड काळात या समाजाने भरभरून केलेली मदत आणि दान यामुळे आपण त्या समस्येचा सामना करू शकलो. महाराष्ट्राच्या प्रगतीत गुजराती समाजाने सर्वार्थाने योगदान दिले आहे.
यावेळी श्री पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पूना गुजराती बंधू समाजच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरचे कार्यकारी संचालक राजेश शहा यांनी केले.
आयुष्याच्या सुरूवातीचा काही काळ मी पुण्यामध्ये भवानी पेठेत राहिलो आहे. त्यामुळे श्री पूना गुजराती बंधू समाजाचे जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटर कसे असेल, याविषयी माझ्या मनात उत्सुकता होती. गुजराती बांधवांनी उभारलेली ही वास्तू म्हणजे देशातील सगळ्या गुजराती बांधवांना अभिमान वाटावा, अशीच असल्याने खूप आनंद वाटला. समाजजीवनाशी संबंधित सर्व सुविधा येथे आहेत. पुण्यातील गुजराती बांधवांनी एकजुटीने तन, मन, धन आणि वेळेच्या रूपाने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण देशामध्ये पुण्यनगरी ही ध्यान, तप, राष्ट्रवाद, सामाजिक चेतना यासाठी सुपरिचीत आहे. स्वातंत्र्य लढ्याचा विचार आणि कृतीशीलतेचे नेतृत्व करण्याचे काम पुण्याने केले आहे.
