घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेची तयारी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सध्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) कडून लवासा परिसरात तपासणी करण्यात आली. ही पाहणी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, यासाठी लवासा परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली. संपूर्ण परिसरातील जोखीम असलेली ठिकाणं, पायाभूत सुविधा आणि स्थानिक यंत्रणा यांची समोरासमोर तपासणी करण्यात आली.
या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, लवार्डे येथे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. अग्निशमन विभाग आणि आपत्ती प्रतिसाद पथकाच्या वतीने अग्निशमन अधिकारी विजय महाजन यांनी आपत्कालीन संपर्क क्रमांक, आपत्ती काळातील कार्यपद्धती आणि खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या वहीवर आपत्कालीन नंबर लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून तो क्रमांक त्यांच्या घरी देखील पोहोचेल. यासोबतच ग्रामस्थांनाही आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक माहिती देण्यात आली. नागरिकांनी आपत्तीच्या काळात शांत राहून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
