तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पडत होती खाली : शेजाऱ्याच्या ओरडण्याने लक्ष गेले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तिसऱ्या मजल्यावरील घरात एकटी असलेली ४ वर्षांची मुलगी अचानक खिडकीतून खाली पडत होती. ती खिडकीच्या गजाला धरून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. समोरील इमारतीतील व्यक्तीच्या आरडाओरड ऐकून अग्निशमन दलाच्या जवानाने धाव घेतली आणि त्या मुलीचा जीव सुखरूप वाचवला.
भाविका चांदणे (वय ४) असे या मुलीचे नाव आहे. कात्रज, गुजर-निंबाळकरवाडीतील खोपडेनगरमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उमेश सुतार हे ओरडताना दिसले. त्यांचा आवाज ऐकून अग्निशमन दलाचे तांडेल योगेश चव्हाण हे बाहेर गॅलरीत आले.
त्यांनी पाहिले, तर एक मुलगी खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकलेली होती. चव्हाण यांनी तातडीने सोनवणे बिल्डिंगकडे धाव घेतली. तिसऱ्या मजल्यावर पोहोचले, तर घराला कुलूप होते व मुलगी घरात एकटीच होती.
मुलीची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडून परत येत होती. त्याचवेळी ती तिथे पोहोचली. आईकडून दरवाजा पटकन उघडून त्या मुलीला बेडरूममधील खिडकीतून घरात खेचून घेतले गेले. अशा प्रकारे त्या मुलीचा जीव वाचला.
ही मुलगी खिडकीतून जवळपास खाली पडण्याच्या स्थितीत आली होती. तिने जीवाच्या आकांताने खिडकीचे गज पकडून ठेवले होते आणि ती जोरजोरात रडत होती. मात्र घरात कोणी नसल्यामुळे तिचा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही.
समोरील इमारतीतील एका व्यक्तीने हे पाहून त्याचा व्हिडिओ काढताना आरडाओरड केली. तो आवाज योगेश चव्हाण यांनी ऐकला आणि ते धावून गेले. आणखी काही क्षण गेले असते, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.
योगेश चव्हाण हे कोथरुड अग्निशमन केंद्रात नियुक्त आहेत. आज त्यांची सुट्टी असल्यामुळे ते घरीच होते. प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने हालचाल करत मुलीचे प्राण वाचवले.
