ब्युटी पार्लरमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखविले होते : भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ब्युटी पार्लरमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालहून पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावलेल्या दोन तरुणींची भारती विद्यापीठ पोलिसांनी सुटका केली. दलालाला अटक करण्यात आली असून त्याची पत्नी फरार आहे.
राजू चिद्रवार (पाटील) (वय २५, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मिरा राजू चिद्रवार ही पळून गेली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २०२३ पासून आतापर्यंत बुधवार पेठ, आंबेगाव पठार आणि आळंदी येथील लॉजवर घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू चिद्रवार आणि मिरा चिद्रवार यांनी फिर्यादीला “ब्युटी पार्लरमध्ये काम लावून देतो” असे सांगून पश्चिम बंगालमधील गावातून पुण्यात आणले.
मात्र, ब्युटी पार्लरमध्ये कामाला न लावता त्यांनी त्या तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. या व्यवसायातून मिळणारे पैसे त्यांनी स्वतःसाठी वापरले. त्यांनी तिला डांबून ठेवले, शिवीगाळ, मारहाण आणि धमकावून छळ केला.
तसेच त्यांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार येथे त्यांनी आणखी एका तरुणीला आणले आणि तिच्याकडूनही वेश्या व्यवसाय करवून घेतला.
संधी मिळाल्यावर त्या तरुणीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आंबेगाव पठार येथे शोध घेतला आणि फिर्यादीसह आणखी एका तरुणीची सुटका केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे करत आहेत.
