महाबळेश्वरला फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा : बाणेर पोलिसांनी दोघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भोसरीतील इंद्राणी नगरमध्ये राहणाऱ्या मित्राला कारमधून महाबळेश्वरला फिरायला जाऊ असे सांगून वाटेत ताम्हिणी घाटात गळा आवळून आणि कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह घाटात टाकून पुण्यात येऊन त्याची कार विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली.
अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. रोकडोबा मंदिराजवळ, हिंगणे खुर्द) आणि तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर (रा. वारजे माळवाडी) याचा शोध सुरू आहे. अनिकेत वाघमारे याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल असून, २०२४ मध्ये दंगल माजवून मारहाण केल्याचे दोन गुन्हे नोंद आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावाच्या हद्दीतून सिक्रेट पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला कोयत्याने गळ्यावर, डोक्यावर आणि हातावर वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. ११ जानेवारी रोजी जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना हा मृतदेह आढळून आला. माणगाव पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली.
अनिकेत वाघमारे, तुषार पाटोळे व प्रज्वल हंबीर हे आदित्य भगत यांच्या इनोव्हा क्रिस्टा कारमधून महाबळेश्वरला फिरायला जात होते. ताम्हिणी घाटात आल्यानंतर पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. तिघांनी आदित्य भगत यांचा दोरीने गळा आवळून खून केला व कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर वार करून मृतदेह सणसवाडी गावाच्या हद्दीत टाकून ते पुण्यात परतले.
बाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रितम निकाळजे यांना ११ जानेवारी २०२६ रोजी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची कार विक्री करण्याचा प्रयत्न करीत ननावरे पुलाजवळ थांबला आहे.
पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अनिकेत वाघमारे असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत त्याने साथीदारांसह आदित्य भगत यांचा खून करून त्याची कार घेऊन पुण्यात आल्याची कबुली दिली. या दोघांना माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चुलमुला, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसनशिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, रोहित पाथरुट व स्वप्निल मराठे यांनी केली.
स्मार्ट वॉचने पटविली ओळख – ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावाच्या हद्दीत खून करून मृतदेह टाकून दिल्याचे आढळले. मात्र मृत व्यक्तीकडे ओळख पटविण्यासाठी कोणतेही कागद नव्हते. त्या वेळी माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या लक्षात मृताच्या हातातील स्मार्ट वॉच आली. त्या स्मार्ट वॉचच्या सहाय्याने काही तासांत मृत व्यक्ती आदित्य भगत असल्याचे तसेच आरोपींची नावे निष्पन्न झाली. बाणेर पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक करण्यात आली.


















