२२ व्या वर्षी उल्लेखनीय यश : दुबईतील आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचा लाभ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : The Institute of Chartered Accountants of India (ICAI) तर्फे जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) अंतिम परीक्षेच्या निकालात बार्शी येथील यश दिनेश श्रीश्रीमाळ यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवत कुटुंबासह बार्शी शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.
यश श्रीश्रीमाळ यांनी आपले तीन वर्षांचे आर्टिकलशिप प्रशिक्षण पुण्यातील नामांकित फर्म Baheti & Somani LLP येथे पूर्ण केले. या कालावधीत त्यांनी Income Tax, GST, Audit तसेच UAE (दुबई) येथील VAT Return या क्षेत्रांमध्ये सखोल अनुभव मिळवला.
प्रशिक्षणादरम्यान एका महत्त्वपूर्ण प्रोजेक्टसाठी त्यांना तीन महिन्यांसाठी दुबई (UAE) येथे काम करण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा अनुभव त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.
आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना यश श्रीश्रीमाळ म्हणाले, “माझ्या या यशामध्ये कुटुंबीयांचे, फर्ममधील वरिष्ठांचे आणि मित्रांचे अमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या पाठबळामुळेच मी हे ध्येय गाठू शकलो. मी सर्वांचा सदैव ऋणी आहे.”

















