सूर्यदत्तच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल लाईफटाइम अचिव्हमेंट’ व ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ पुरस्काराने गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रेम, मैत्री, करुणा आणि जागतिक शांततेचा संदेश देणारे मैत्रीबोध परिवारचे संस्थापक प्रेमावतार मैत्रेय दादाश्री महाराज यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे वर्ष २०२६ चे मानाचे ‘सूर्यरत्न – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ हा किताब प्रदान करण्यात आला. तसेच ‘सूर्यदत्त ग्लोबल लाईफटाइम अचिव्हमेंट’ आणि ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ या प्रतिष्ठित पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रेमावतार मैत्रेय दादाश्री महाराज यांनी प्रेम, करुणा, अध्यात्म आणि मानवी मूल्यांचा जागतिक स्तरावर प्रसार करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे कर्जत येथील मैत्रीबोध आश्रमात आयोजित प्रेरणादायी सोहळ्यात त्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सूर्यदत्त समूहाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दादाश्रींना सूर्यदत्त समूहाची सर्वोच्च विशेष उपाधी ‘सूर्यरत्न – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ प्रदान करण्यात आली. यापूर्वी ही उपाधी श्री श्री रविशंकर, ज्ञानवत्सल स्वामी आणि स्वामी चिदानंद सरस्वती यांसारख्या आध्यात्मिक विभूतींना देण्यात आली आहे.
याशिवाय ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ हा सन्मान प्रथमच जाहीर करण्यात आला असून त्याचे पहिले मानकरी म्हणून दादाश्री महाराजांचा गौरव करण्यात आला. दादाश्रींचे विचार आणि निस्वार्थ सेवाकार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत शांततेचा मार्ग दाखवणारे ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दादाश्री महाराज म्हणाले की, “सूर्यदत्तसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून मोठी जबाबदारी आहे. आजच्या पिढीला केवळ शिक्षण नव्हे तर प्रेम, मैत्री आणि शांततेची मूल्ये देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
सूर्यदत्त आणि मैत्रीबोध हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; ‘समाजसुधारणा आणि युवा पिढीला योग्य दिशा देणे’ हे दोन्ही संस्थांचे समान उद्दिष्ट असल्याचे नमूद करत, मैत्रेय दादाश्रीजी यांनी सूर्यदत्त समूहाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमानिमित्त मैत्रीबोध परिवाराच्या वतीने सूर्यदत्त समूहातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी विशेष ध्यानधारणा (मेडिटेशन) आणि मानसिक आरोग्यविषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांमुळे उपस्थितांना मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जगात प्रेम, करुणा आणि निस्वार्थ सेवेचा दीप प्रज्वलित करणारे दादाश्री महाराजांचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी वंदनीय आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















