ईव्हीएम वाटप, मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी वाहतूक निर्बंध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील काही भागांत तीन दिवस वाहतुकीत बदल केले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम वाटप, त्यांची वाहतूक, तसेच मतदान केंद्रे व मतमोजणी ठिकाणांच्या परिसरात वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. १४ ते १६ जानेवारी दरम्यान शहरातील विविध भागांत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत.
विमानतळ वाहतूक विभाग फिनिक्स मॉलमागील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. वाहनचालकांनी विमाननगर चौक व नगर रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
विश्रामबाग वाहतूक विभाग टिळक रस्त्यावरील पूरम चौक व टिळक चौक मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्ता व शास्त्री रस्ता या मार्गांचा वापर करावा.
दत्तवाडी वाहतूक विभाग ना. सी. फडके चौक (निलायम चित्रपटगृह) तसेच सारसबाग परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी बाजीराव रस्ता व अप्पा बळवंत चौक या मार्गांचा वापर करावा. टिळक रस्त्याकडे जाणारी वाहतूक देशभक्त केशवराव जेधे चौक (स्वारगेट) येथून वळविण्यात येणार आहे.
हडपसर वाहतूक विभाग शिवसेना चौक ते साने गुरूजी मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी अमरधाम, माळवाडी, डीपी रस्ता व हडपसर गाडीतळ या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
समर्थ वाहतूक विभाग
नेहरू रस्त्यावरील पॉवर हाऊस चौक ते संत कबीर चौक, तसेच ए. डी. कॅम्प चौक ते जुना मोटार स्टँड या भागांत वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी रास्ता पेठेतील शांताई चौक व क्वार्टर गेट मार्गे इच्छित स्थळी जावे.
कोरेगाव पार्क वाहतूक विभाग नॉर्थ मेन रस्ता तसेच महात्मा गांधी चौक परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी कोरेगाव पार्क मुख्य चौक व एबीसी फार्म मार्गे प्रवास करावा. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.


















