शिवीगाळ केल्याने झाला होता वाद : पर्वती पोलिसांनी पाच जणांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरून झालेल्या वादावरून दुसऱ्या दिवशी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
या घटनेत मुकेश नामदेव पोटे (वय ४२, रा. जनता वसाहत, पर्वती) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुमित हरीदास पवार (वय ३२, रा. पर्वती), विजय प्रकाश हुलावळे (वय २९), भैय्या ऊर्फ आशुतोष सुभाष पवार (वय २५), निलेश रमेश पवार (वय ४०) आणि किरण रमेश पवार (वय ३३, सर्व रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही घटना जनता वसाहतीतील वाघजाई माता मित्र मंडळासमोर १८ जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्रांशी मतमोजणीच्या वेळी आरोपींबरोबर वाद झाला होता आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती.
१८ जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता फिर्यादी व त्यांचे मित्र घरी जात असताना तेथे थांबलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तेव्हा मुकेश पोटे यांनी शिवीगाळ का करता, असे विचारले. त्यावर सुमित पवार व विजय हुलावळे यांनी तीक्ष्ण हत्याराने मुकेश पोटे यांच्यावर सपासप वार केले.
तसेच इतर आरोपींनी फिर्यादींच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी ५ जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. एम. माळी तपास करीत आहेत.















