महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : अर्हम् ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आयऑन यांच्या वतीने मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्हम् महाविद्यालय, गुलटेकडी, जवाहरलाल नेहरू मार्ग येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या नोकरी मेळाव्यात एकूण आठ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. संगणकशास्त्र, बी.एस्सी. (संगणकशास्त्र), बीसीए (संगणक अनुप्रयोग), बीबीए (आंतरराष्ट्रीय व्यवसाय) व एमबीए या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.
यामध्ये S. M. Joshi College, Arihant College, H. V. Desai College, Modern College आणि Sarhad College या महाविद्यालयांचा विशेष सहभाग होता. या मेळाव्यात Paytm, Quess Corp Ltd, Lenskart, Axis Bank, Solar Square Energy Pvt Ltd, I Marque Solutions Pvt Ltd, Decathlon आणि Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd. या कंपन्यांनी सहभाग घेतला.
एकूण १७५ विद्यार्थ्यांनी या नोकरी मेळाव्यात सहभाग नोंदवला असून त्यापैकी ४३ उमेदवारांची यशस्वी निवड करण्यात आली. Solar Square Energy मध्ये ७, Lenskart मध्ये ७, Bajaj Allianz Life Insurance मध्ये ५, I Marque Solutions मध्ये १५, Decathlon मध्ये ४, Axis Bank मध्ये २ आणि Paytm मध्ये ३ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना लवकरच संबंधित कंपन्यांमध्ये रुजू करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल टीसीएस आयऑनची टीम तसेच विविध कंपन्यांचे अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास डॉ. नेहा पाटील, प्रा. डॉ. मेहबूबसाब नगरबावडी, डॉ. अतीश चोरडिया, डॉ. शैलेश पगारिया व स्वराज पगारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. स्वाती सकलेजा (प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी) व डॉ. प्रज्ञा देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
तसेच सर्व प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व उद्योगजगताशी त्यांना जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन प्रत्येक महाविद्यालयाने करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
















