महाराष्ट्र जैन वार्ता
केडगाव : केडगाव येथे भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाजारपेठेत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी सुरू झालेल्या या मिरवणुकीत स्त्री-पुरुष, युवक-युवतींसह सुमारे 500 ते 600 अनुयायी उत्साहाने सहभागी झाले होते.
या शोभायात्रेत “जियो और जीने दो”, “अहिंसा परमो धर्म”, “मानव कल्याण की जय हो”, “त्रिशला नंदन वीर की जय”, “बोलो महावीर की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीदरम्यान लहान मुलांनी सादर केलेले लेझीम प्रदर्शन विशेष लक्षवेधी ठरले.
मिरवणूक जैन स्थानकात पोहोचताच तिचे प्रार्थना सभेत रूपांतर झाले. यावेळी नवकार मंत्र जप करण्यात आला तसेच भगवान वर्धमान महावीर यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्रफीत सादर करण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांनी ‘भगवान वर्धमान महावीर’ या विषयावर लघुनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच बी. डी. सोडणार यांनी शुभेच्छा दिल्या. जैन श्रावक संघाचे अध्यक्ष मनोज पोखरणा यांच्यासह प्रीतम पितळे, विकास छाजेड, नितीन छाजेड, गौरव गुंदेचा, निशांत चोपडा, संतोष शिलोत, चेतन मांडोत, अभय पितळे, आनंद कासवा, नितीन पितळे, नितीन कटारिया, नरेंद्र गांधी आदी श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत पितळे आणि संदीप कोठारी यांनी केले. गौतम प्रसादीचे नियोजन संजय भंडारी, विशाल मांडोत, सनी गुंदेचा आणि आनंद बोरा यांनी केले. गौतम प्रसादीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



















