‘त्रिशला नंदन वीर की… जय बोलो महावीर की’ जयघोषात भक्तिमय वातावरण
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की…’, ‘प्रेम से बोलो जय महावीर’ अशा जयघोषात तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आज (दि. ३१) भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगलवाद्यांच्या सुरात भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेला अभिवादन करत शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेच्या पुढाकारातून आयोजित या शोभायात्रेस श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज तसेच विविध स्थानिक संस्थांचे सहकार्य लाभले.
समितीचे अध्यक्ष अचल जैन, कार्याध्यक्ष प्रकाश धारीवाल, महावीर कटारिया, सुधीर शहा, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, कोषाध्यक्ष समीर जैन, सहकोषाध्यक्ष अल्पेश गोगरी, प्रचारप्रमुख नितीन जैन, सल्लागार सुनिल कटारिया, हरेश शहा, विजयकांत कोठारी, भरत सुराणा, जिनेंद्र कावेडिया, विनोद सोलंकी, संजय ओस्तवाल, प्रमोद छाजेड, अनिल नहार, प्रविण सोलंकी, सत्यजीत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले.
सकाळी साडेसात वाजता गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथांमधून भगवान महावीर स्वामीजींची प्रतिमा मिरविण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी चांदीचा रथ विशेष आकर्षण ठरला. पुण्यातील विविध जैन मंदिरांचे एकूण २० रथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले. त्यांच्या अहिंसा, सत्य आणि संयम या जीवनमूल्यांचे जिवंत चित्रण करण्यात आले. श्री क्षत्रिय घांची समाज ट्रस्टच्या सदस्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर फेर धरत वातावरण भारावून टाकले. तसेच लाठ्या-काठ्या, दांडपट्टा यांसारख्या आत्मसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांनी लहान मुलांनी उपस्थितांची दाद मिळवली. सनई-चौघडा आणि ढोल-ताशा पथकांच्या गजरात शोभायात्रा अधिकच रंगतदार झाली.
जैन बंधू-भगिनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा भांडी आळी, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती चौक, गणेश पेठ, गोविंद हवालई चौक, बुरुडी पूल, पालखी विठोबा चौक, शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हन लव्हज चौक, अप्सरा चौक, प्रभात प्रेस, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर सभागृह, सातारा रोडमार्गे आदिनाथ स्थानक येथे दुपारी पोहोचली. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
सोन्या मारुती चौकात आमदार हेमंत रासने, रमेश बागवे, प्रवीण चोरबेले, ॲड. अभय छाजेड, अजय खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भगवान महावीर स्वामीजींच्या प्रतिमेचे तसेच जैन साधू-साध्वींचे दर्शन घेतले.
दरवर्षी या महोत्सवानिमित्त युवकांची दुचाकी रॅली आयोजित केली जाते; मात्र यंदा पेट्रोल टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन रॅली रद्द करून सामाजिक भान जपण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.



















