महावीर जयंतीनिमित्त जैन सामुदायिक उत्सव समितीचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यात महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नाट्य व नृत्याच्या माध्यमातून भगवान महावीरांच्या जीवनातील २७ भवांचा अद्भुत प्रवास सादर करण्यात आला.
तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२५व्या जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त जैन सामुदायिक उत्सव समिती (सकल जैन संघ) यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात “कर्मबंधन – गलतियों से मोक्ष तक की अद्भुत यात्रा” या नाट्यप्रयोगातून भगवान महावीरांच्या २७ भवांचा प्रेरणादायी प्रवास सादर करण्यात आला.
नृत्य व नाट्याभिनयाच्या माध्यमातून कलाकारांनी भगवान महावीरांच्या पूर्वजन्मांपासून आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास, मन आणि आत्म्याच्या विविध अवस्थांचे प्रभावी चित्रण केले. मुंबईतील सचिन शहा यांच्या रंगत प्रॉडक्शनतर्फे या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी हजारो दिव्यांच्या प्रकाशात भगवान महावीरांची आरती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पूर्वा शहा आणि त्यांच्या शिष्यांनी कथक नृत्याच्या माध्यमातून नवकार महामंत्राचे सादरीकरण केले. माणिकचंद ग्रुपचे प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी दीना धारीवाल, आदित्य धारीवाल, साक्षी रोहित मेहता, विजयकांत कोठारी, ॲड. एस. के. जैन, राजेश शहा, विजय भंडारी, मिलिंद फडके, राजकुमार चोरडिया, समितीचे अध्यक्ष अचल जैन, अनिल गेलडा, संपत जैन, समीर जैन, दिलीप मेहता, सुधीर शहा, सुनील कटारिया, संदीप भंडारी, प्रवीण चोरबोले, ललित गुंदेशा, इंद्रजी जैन, इंद्रकुमार छाजेड, विरेन शहा आदी उपस्थित होते.
अध्यक्ष अचल जैन यांनी प्रास्ताविकात जैन समाजातील विविध संघटनांचे कार्य आणि मागील ७४ वर्षांपासून महावीर जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी शोभायात्रा व विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या सहभागींचा सन्मान करण्यात आला.
प्रकाश धारीवाल यांनी जैन एकतेचा संदेश देत ९ एप्रिल रोजी होणाऱ्या नवकार महामंत्र कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत जैन आणि अनिल गेलडा यांनी केले, तर समीर जैन यांनी आभार मानले.




















