अहिंसा रॅली, पदयात्रा, पुरस्कार व भक्ती संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र जैन वार्ता
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा, अहिंसा पुरस्कार वितरण, भक्ती संध्या तसेच भक्ती गीत स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश होता.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सांगवी येथील संस्कृती लॉन येथून भव्य अहिंसा रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली सांगवी, दापोडी, नाशिक फाटा, पिंपरी, चिंचवडगाव, बिजलीनगर मार्गे पार्श्वनाथ चौक येथे संपन्न झाली. रॅलीमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांचा सहभाग होता.
त्यानंतर भगवान महावीरांची प्रतिमा असलेली पालखी अहिंसा पदयात्रेद्वारे गदिमा सभागृहापर्यंत नेण्यात आली. “अहिंसा परमो धर्म” आणि भगवान महावीरांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या रॅलीत हजारो जैन बांधव व भगिनी सहभागी झाले होते.
अहिंसा रॅलीचा शुभारंभ चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप व स्थानिक नगरसेविका यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला. पार्श्वनाथ चौक येथे प्रकाश कटारिया व सुरेखा कटारिया यांच्या परिवारासह बिजलीनगर संघाच्या सदस्यांनी रॅलीचे भव्य स्वागत केले. तसेच उभारण्यात आलेल्या अहिंसा स्तंभाला सर्वांनी मानवंदना अर्पण केली.
यानंतर गदिमा सभागृहात जालना येथील प्रसिद्ध संगीतकार मेहूल रुपडा यांच्या भक्तीगीतांच्या कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. उपस्थित भाविक भक्तीच्या रंगात रंगून गेले आणि नृत्याच्या माध्यमातून त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी अहिंसा पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला. यावेळी प्राईड ग्रुपचे अरविंद जैन, दुबई स्थित उद्योजक व समाजसेवक धीरज जैन, स्वागताध्यक्ष किरण शहा, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया तसेच माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, विलासकुमार पगारिया, सुदिन खोत, सूर्यकांत मुथियान, विरेंद्र जैन व उमेश पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या धर्मपत्नी ह.भ.प. शालिनीताई देशमुख इंदुरीकर, प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर, शिक्षणतज्ज्ञ मनोज देवळेकर आणि समाजसेवक एम. ए. हुसेन यांना अहिंसा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी महासंघाचे कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गदिया, रमणलाल शिंगवी, शांतिनाथ पाटील, उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, राजेंद्र कर्नावट, तुषार मुथा, विरेश छाजेड, सुरगोंडा पाटील, संदेश गदिया, धीरज नहार तसेच सचिन कोगनाळे, स्नेहल भंडारी, मयूर पगारिया, अभिनंदन छाजेड, देवेंद्र पारख, निखिल मुनोत, शुभम कटारिया, सचिन गांधी, प्रतिकेश गांधी, सौरभ अलासे, अनिता नहार, हर्षल लुंकड, गणराज माकुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी केले, अहिंसा पुरस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अशोक कुमार पगारिया यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्वेता राठोड यांनी केले आणि आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष विजय भिलवडे यांनी केले.



















