९ एप्रिल रोजी एस.पी. कॉलेज ग्राउंड येथे भव्य आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जागतिक स्तरावर शांती, सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याच्या उद्देशाने ९ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात ‘विश्व नवकार दिवस’ निमित्त भव्य सामूहिक नवकार महामंत्र पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील एस.पी. कॉलेज ग्राउंडवर सकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) पुणे चॅप्टरच्या वतीने, जितो पुणेच्या ॲडव्हायजरीच्या सानिध्यात तसेच अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल आणि सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साकारला जात आहे.
गेल्या वर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा कार्यक्रम अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात सादर केला जात असून, सुमारे २५,००० भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. सामूहिक मंत्रोच्चारातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करून संपूर्ण विश्वात शांततेचा संदेश पोहोचविण्याचा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या संपूर्ण आयोजनात जितो पुणेचे सह-सेक्रेटरी ॲडव्होकेट विशाल शिंगवी, खजिनदार दिलीप जैन, सह-खजिनदार रुपेश कोठारी, अमोल कुचेरीया तसेच उपाध्यक्ष विशाल चोरडिया, अजय मेहता, विनोद मांडोत आणि चेतन भंडारी यांच्यासह सर्व पदाधिकारी सक्रिय सहभाग घेत आहेत.
या उपक्रमामुळे पुणे शहरातून जगभरात शांतता, एकता आणि मानवतेचा संदेश पोहोचणार असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भव्य जर्मन हॅंगर मंडपात होणार आयोजन
कार्यक्रमासाठी १५५ × ४०० चौ. फूटाचा अत्याधुनिक जर्मन हॅंगर मंडप उभारण्यात येत असून, हजारो भाविकांसाठी प्रशस्त व सुसज्ज बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. उन्हापासून संरक्षण आणि सुव्यवस्थित आयोजन यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
















