सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून पाच लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
खय्युम रफिक बेग शेख (वय १९, रा. संजय गांधी नगर परभणी), अमीर उर्फ अज्जू मुखबिर खान, (वय २३, रा. संजय गांधी नगर, परभणी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, बार्शी शहरातील भोसले चौक येथे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी परभणी येथील दोन संशयित पांढऱ्या इंडिका व्हिस्टामधून चोरीचे सोने विक्रीकरिता येरमाळा मार्गे बार्शी येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बार्शी येथे थांबून कुसंळम रस्त्याने पांढरी इंडिकामधील व्यक्तींना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी त्याने घरफोडीतील सोने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.
आरोपींची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार, विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण पाच लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन आरोपींपैकी एका आरोपीवर बीड, परभणी, हैदराबाद, तेलंगना, गुलबर्गा, कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे, राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार सलीम बागवान, मोहन मनसावाले, अन्वर अत्तार व केशव पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
