टीव्ही चॅनेलवरील डिबेट शोमधील वादावादीचे कारण, तुषार दामगुडेंसह चौघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : टीव्ही चॅनेलवरील डिबेट शोमध्ये झालेल्या वादातून काँग्रेसचे प्रवक्ते हणुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे व त्यांच्या साथीदारांकडून पिस्तूल दाखवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
याबाबत हणुमंत दिगंबर पवार (वय ४१, रा. जाधवनगर, वडगाव) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, श्रीनिवास निगडे, ऋषिकेश परदेशी या चौघांना अटक केली आहे.
त्यांचे साथीदार, गौरव राठोड, अभिमन्यु मैड यांच्यावर दंगल घडविण्याचा प्रयत्नासह मारहाणीच्या कलम १९०, १९१ (२), १९२, ११५ (२), ३५१ (३), ३५२, आर्म ३० या खाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मित्र मंडळ चौकातील पुढारी भवन बाहेर २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढारी न्युज चॅनेलच्या डिबेट शो करीता तुषार दामगुडे आणि हणुमंत पवार हे आले होते. या डिबेट शोमध्ये या दोघांमध्ये वादावादी झाली. डिबेट शो संपल्याने ते पुढारी भवनच्या खाली आहे. त्यावेळी दामगुडे यांनी आपल्या साथीदारांना अगोदरच बोलावून ठेवले होते.
यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. तुषार दामगुडे याने ‘‘तु भाजपा विरोधात का बोलतो, तुला एवढा का पुळका आहे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर तुला राग का येतो, माज्या कमरेला काय आहे बघ, पुण्यात जिवंत रहायचे असेल, पुण्यात फिरायचे असेल तर नीट वागायचे,’’ असे म्हणून दामगुडे याने कमरेचे पिस्तुल दाखविले.
यावर हणुमंत पवार यांनी त्यांना “मी असल्या खेळण्यांना भीक घालत नाही़,’ असे म्हटल्याने दामगुडे आणि त्याच्या साथीदारांनी पवार यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तोंडावर ठोसे मारुन अरवाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस वरिष्ठ नेते अॅड. अभय छाजेड, प्रशांत जगताप आणि इतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम व त्यांचे अधिकारी घटनास्थळी आले. स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करीत आहेत.
पिस्तुल दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न
टीव्ही शोमध्ये एकमेकांवर नेते शाब्दिक आरोपांची राळ उघडवुन देतात. काही टीव्ही शोमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकार हा शो सुरु असताना दिसून आले आहे. परंतु, महाराष्ट्रात डिबेट शोमध्ये कितीही वादावादी झाली तरी ते नेते एकमेकांच्या हातात हात घालून तेथून बाहेर पडताना दिसत होते. परंतु, सोमवारी पुण्यात झालेला प्रकार हा धक्कादायक होता. चक्क एकाने पिस्तुलचा धाक दाखवून दुसर्या नेत्याला साथीदारांना बोलावून मारहाण केली. तुषार दामगुडे याने आपल्याला पिस्तुल दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हणुमंत पवार यांनी केला आहे.















