२६ फेब्रुवारी रोजी संयुक्त बैठक : तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील सभासदांच्या प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पणन संचालकांनी संयुक्त बैठक आयोजित केल्याने २५ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित लाक्षणिक बंद स्थगित करण्यात आला आहे.
मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील सभासदांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच वाढत्या अडचणींकडे कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला होता.
हा बंद दि पूना मर्चेंटस् चेंबर यांच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. मात्र, या समस्यांवर चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी मा. पणन संचालक यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती व दि पूना मर्चेंटस् चेंबर यांची संयुक्त बैठक गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
त्यामुळे सदरचा लाक्षणिक बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मार्केट यार्ड गुळ-भुसार विभागातील वाढत्या समस्यांमुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी असून, या बैठकीतून समाधानकारक निर्णय न झाल्यास सभासदांची स्वतंत्र बैठक घेऊन पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली आहे.















