दोन गुन्हे उघड : डेक्कन पोलिसांची दमदार कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एस. एम. जोशी पुलाखाली संशयास्पदरित्या थांबलेल्या चोरट्याला पकडून डेक्कन पोलिसांनी वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
विनायक किरण पाटोळे (वय १९, रा. जनवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, तपास पथकातील अंमलदार सागर बाबरे व दादासाहेब बर्डे यांना दुचाकी चोरटा एस. एम. जोशी पुलाखाली थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनायक पाटोळे याला पकडले. त्याच्याकडील दुचाकी ही डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे आढळून आले. पाटोळे याला अटक करुन अधिक तपास करता अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली आणखी एक दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आली.
परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, तपास पथकातील सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.