वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी डॉ. संदीप भाजीभाकरे
पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या : परिमंडळ ३ च्या उपायुक्तपदी डॉ. सागर कवडे यांची नियुक्ती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यानुसार विशेष शाखेतील पोलीस उपायुक्त डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे यांची वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांची परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथून पुण्यात बदली होऊन आलेले सहायक पोलीस अधीक्षक जीवन देवाशिष बेनिवाल यांची परिमंडळ ६ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १६ चे समादेशक प्रशांत श्रीराम अमृतकर यांची विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पंकज देशमुख प्रतिनियुक्तीवर दिल्लीत – अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांची इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या संचालकपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. पंकज देशमुख यांनी गेल्या काही वर्षांत पोलीस उपायुक्त म्हणून पुणे शहर, सीआयडी तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) म्हणून त्यांना पुण्यात बढती मिळाली होती. आता त्यांची दिल्लीत प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे.
