डोक्यात कोयत्याने वार करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न
फटाक्यावरून रिक्षाचे चाक गेल्याने वाद : नाना पेठेतील घटनेत समर्थ पोलिसांनी दोघांना केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रस्त्यावर फटाके उडवत असताना फटाक्यावरून रिक्षाचे चाक गेल्याने झालेल्या वादात रिक्षाचालक वडिलांना वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या तरुणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिला बेशुद्ध पाडण्यात आले. समर्थ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
या घटनेत आकांक्षा नितीन साळवे (वय २१, रा. पत्रा चाळ, न्यू नाना पेठ) हिच्या डोक्यात वार झाल्याने ती जागेवरच बेशुद्ध पडली होती. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत तिचे वडील नितीन गिरधारी साळवे (वय ४२, रा. एसआरए बिल्डिंग, पत्रा चाळ, न्यू नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विनायक आतिश कांबळे (वय २६) आणि आर्यन विजय शिंदे (वय १८, दोघे रा. ताडीवाला रोड) यांना अटक केली आहे. तसेच संदेश संजय जाधव (वय ३०, रा. पत्रा चाळ, न्यू नाना पेठ) व त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता नाना पेठेतील होप हॉस्पिटलजवळील पत्रा चाळ येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे रिक्षाचालक आहेत. दिवाळीनिमित्त ते आपल्या बहिणीला भेटून पत्नी व मुलीसह ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता रिक्षाने घरी परत येत होते. त्यावेळी त्यांच्या एसआरए बिल्डिंगमध्ये राहणारे संजय ऊर्फ काळू जाधव (वय ५०) व त्यांचा जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे हे रस्त्यावर फटाके वाजवत होते. उबाळे याच्या फटाक्यावरून रिक्षाचे चाक गेल्याने त्याने नितीन साळवे यांना शिवीगाळ केली. फटाका दिसला नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी तो पुन्हा आला आणि नितीन साळवे यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी पत्नी आली असता तिला धक्का लागून ती खाली पडली. त्यामुळे तिच्या गुडघ्याला मार लागला. त्यावेळी त्यांनी वाद मिटवून घरी जाणे पसंत केले.
त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नितीन साळवे हे घराजवळील होप हॉस्पिटलजवळ गेले होते. तेथे संजय जाधव यांचा मुलगा संदेश जाधव व त्याचे मित्र होते. त्यांना पाहून संजय जाधव यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या तीन मित्रांना सांगितले की, आपल्या दाजीसोबत फटाक्यावरून याचेच भांडण झाले होते. असे सांगून ते नितीन साळवे यांच्याजवळ आले. संदेश जाधव व त्याच्या साथीदारांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना का मारत आहात, असे विचारले असता ते, “तुला लय माज आला आहे,” असे म्हणत होते.
त्यांचे भांडण पाहून ते सोडविण्यासाठी नितीन साळवे यांची पत्नी, दोन्ही मुली आणि भाचा निकुल अशोक जगताप तेथे आले. ते मारहाण करणाऱ्यांना सोडवत होते. त्यावेळी संदेश जाधव याच्याबरोबर असलेल्या विनायक कांबळे याने त्याच्याकडील धारदार हत्यार काढले. “तुला लय माज आला आहे, आज तुला खल्लासच करून टाकतो,” असे म्हणत त्याने नितीन यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची मुलगी आकांक्षा मध्ये आली असता तिच्या डोक्यात कोयत्याचा वार लागून ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती बेशुद्ध पडली. हे पाहून संदेश जाधव व त्याचे साथीदार पळून गेले. नितीन साळवे यांनी आकांक्षाला ससून रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संदेश जाधव याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
परस्परविरोधी तक्रार दाखल
अटक आरोपी विनायक आतिश कांबळे (वय २६, रा. लुंबिनीनगर, ताडीवाला रोड) याने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून नितीन गिरधारी साळवे व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषी उबाळे याच्याबरोबर फटाक्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून विनायक कांबळे व आर्यन शिंदे यांना लोखंडी हत्याराने मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताला दुखापत केली. तसेच विनायक कांबळे यांच्या तोंडावर हाताने बुक्की मारून गंभीर दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
