अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची ३२ लाखांची फसवणूक
कर्वेनगरमधील महिलेच्या आधार कार्डाचा वापर केल्याची बतावणी : वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नाशिक येथील एका बँकेची दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाइलवर ६ ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डाचा वापर करून नाशिक येथील कॅनरा बँकेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून, फसवणुकीची रक्कम तुमच्या बँक खात्यावर पाठविण्यात आली आहे.
तुम्ही ही रक्कम आम्हाला परत करा, अन्यथा तुमच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाईल. तुम्हाला अटक करून तुमची सर्व मालमत्ता गोठवली जाईल, अशी धमकी त्यांनी दिली. तसेच, त्यांना डिजिटल अरेस्ट करण्याची धमकीही देण्यात आली.
अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात आरटीजीएस सुविधेचा वापर करून वेळोवेळी ३२ लाख रुपये जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर महिलेकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. महिलेने चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करत आहेत.
अमली पदार्थ तस्करीत कारवाईची भीती दाखवून पाच लाखांचा गंडा – अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी भारती विद्यापीठ परिसरातील एका व्यक्तीची ५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत आंबेगाव बुद्रुक येथील ५४ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून दिल्लीतील दूरसंचार विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. तुमच्या मोबाइल क्रमांकाचा वापर मनी लाँडरिंग, मानवी तस्करी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी करण्यात आला असून, या प्रकरणात तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी ५ लाख २० हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक रंगराव पवार तपास करत आहेत.
