डोक्यात दगड घालून कॅबचालकाला गंभीर जखमी केले
आंबेगाव पठार येथील घटना : अॅपपेक्षा मीटरने जास्त पैसे घेतल्यावरून झाला वाद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रॅपिडो व इतर वाहन कंपन्यांच्या अॅपवर आरटीओने जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दर दाखविले जातात. हे दर परवडत नसल्याचे सांगून कॅबचालक शासनाच्या मीटरप्रमाणे भाडे मागतात. कंपनीच्या अॅपवर दिसणारे भाडे आणि त्यापेक्षा जास्त भाडे कॅबचालक मागत असल्याने शहरात वादावादी होताना दिसून येत आहे. याच कारणावरून प्रवाशाच्या नातेवाईकाने कॅबचालकाला रस्त्यात गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत कॅबचालक कुमार देवानंद गायकवाड (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कबीर रजनिकांत मुलतानी आणि युवराज म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता आंबेगाव पठार येथील जिजामाता चौकात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुमार गायकवाड हे कॅबचालक आहेत. ते पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दोन महिला व एका पुरुष प्रवाशाला घेऊन वानवडीतील फातिमानगर येथून आंबेगाव पठार येथे आले. तेव्हा अॅपवर ३५० रुपये भाडे दाखविण्यात आले होते, तर मीटरप्रमाणे ३८० रुपये झाले होते. त्यांनी ३८० रुपये भाडे सांगितले. त्यावर प्रवासी महिलेने, ‘थांबा, माझे पती येत आहेत,’ असे सांगितले. त्यांनी ३८० रुपये दिल्यानंतर कुमार गायकवाड हे कॅब घेऊन तेथून निघाले.
काही अंतरावर गेल्यावर दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी कॅब थांबविण्यास सांगून, ‘आता तुम्हीच दोन महिला आणि एका पुरुषाला सोडले का?’ असे विचारले. त्यावर त्यांनी होकार दिला. तेव्हा त्यांनी कॅबची चावी काढून घेतली. त्यांना कॅबमधून बाहेर काढून दोघांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. ते खाली पडल्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी एकाने बाजूला असलेला दगड उचलून कॅबचालकाच्या डोक्यात घातला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
कॅबचालकाने ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी कॅबचालकाला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक सुमित दळवी तपास करीत आहेत.
