एअरपोर्टवरून पळून जाणाऱ्या बांगलादेशी महिलेसह तिघे जेरबंद
१० महिन्यांत ९७ बांगलादेशी जाळ्यात : पुणे विमानतळावर कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मूळचे बांगलादेशी असताना बेकायदेशीरपणे सोलापूर येथे वास्तव्यास राहून पुणे विमानतळावरून पळून जाणाऱ्या २ महिला व एका अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी आपल्या १० महिन्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत तब्बल ९७ बांगलादेशींना पकडले आहे.
शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (वय २८, दोघी मूळ रा. बांगलादेश) व त्यांचा १६ वर्षीय मुलगा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, २ महिला व एक मुलगा बांगलादेशी असून ते पुणे विमानतळावरून गुवाहाटी येथे जाणार आहेत. या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना विमानतळ येथे पाठविले.
पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यातील रात्रगस्त पथकाचे पोलीस अधिकारी पालवे, सीआरएसएफचे अधिकारी संतोष कुमार अग्निहोत्री व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने विमानतळ येथे सापळा रचला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन महिला व मुलाला ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ते मूळचे बांगलादेशातील असून सोलापूर येथे राहत असल्याचे सांगितले. पुण्याहून आसाममधील गुवाहाटी येथे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील कारवाईसाठी त्यांना विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार किरण ठवरे, निलेश दिवटे, शुभम केदारी, विश्वजित गोरे, विकास पांडोळे, माने, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पालवे, सीआरएसएफचे अधिकारी संतोषकुमार अग्निहोत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
