आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अशोक जैन आत्महत्या प्रकरणी चौघांचा जामीन अर्ज फेटाळला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 13, 2026
Spread the love

पुणे : बांधकाम व्यावसायिक अशोक जैन यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कथित आर्थिक फसवणूक, मृताच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेता आरोपींना जामीन मंजूर करता येणार नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. उदगांवकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

नथुसिंग बिहारीलालजी पुरोहित (वय ७०, रा. अनूतेज सिम्फनी, नाना पेठ), सतीश लक्ष्मणसिंग राजपुरोहित (वय ६२, रा. जैन मंदिराजवळ, स्टेशन रोड, सोमवार पेठ), भगवानसिंग लक्ष्मणसिंग राजपुरोहित (वय ५२, रा. अपोलो थिएटरजवळ, रास्ता पेठ) आणि प्रल्हादराम देवाराम चौधरी (वय ६१, रा. घोरपडे कॉम्प्लेक्स, सोमवार पेठ) अशी जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बांधकाम व्यावसायिक अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. सॅलिस्बरी पार्क) यांचा मृतदेह आपटे रस्त्यावरील एका हॉटेलच्या खोलीत आढळून आला होता. त्यांच्या शरीरावर ओरखडे तसेच इतर जखमांचे निशाण आढळले होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी अशोक जैन यांचे पुत्र मोहित जैन यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बांधकाम प्रकल्पाच्या व्यवहारातून आरोपींनी अशोक जैन यांचे सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी चौघांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आरोपींनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, अशोक जैन यांच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप आणि त्यामागील कारण स्पष्ट करणारा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तपास पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने चौघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.