मेडिकलला प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यास अटक
राज्यातील ४० हून अधिक पालकांना घातला गंडा : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील ४० हून अधिक पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालविणाऱ्या तेलंगणातील एका संस्थाचालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध हैदराबाद येथे तीन आणि मुंबई येथे तीन असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, अरविंद आरोगोंडा याने पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे, मुंबई आणि हैदराबाद येथे एजंट नेमले होते. पुण्यात नेमलेला एजंटही हैदराबादचा असून त्याला मराठी भाषा अवगत होती. त्यामुळे स्थानिक लोकांशी सहज संपर्क साधता यावा, या उद्देशाने त्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित एजंट फरार झाला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने एका पालकाची ८ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी १८ मार्च रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपीला सर्वप्रथम हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन मुंबईतील गुन्ह्यात अटक केली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. पुढे न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा पोलिसांनी तपासासाठी त्याचा ताबा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तसेच पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय आणि साईनाथ म्हस्के यांनी केली.
सोशल मीडियावरून केली होती जाहिरात
अरविंद आरोगोंडा आणि त्याच्या साथीदारांनी हैदराबाद येथे ‘एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि.’ नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या पुणे आणि मुंबई येथेही शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याच्या जाहिराती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत होत्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मार्गदर्शनासाठी ५ लाख रुपये, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी ३ लाख रुपये शुल्क आकारले जात होते. तसेच प्रवेश मिळाला नाही तर पैसे परत देण्याचे आमिषही पालकांना दाखविण्यात येत होते.तपासादरम्यान आतापर्यंत राज्यातील ४० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
