पिंपळे गुरवच्या वॉर्ड निरीक्षक अभियंत्याला लाच घेताना अटक
बांधकाम पाडण्याची भीती दाखवून मागितली ७० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उच्च न्यायालयाने दंड भरून बांधकाम नियमित करण्याचे आदेश दिलेले असतानाही बांधकाम पाडण्याची भीती दाखवून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभागातील वॉर्ड निरीक्षक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
उमेश अरुण लोंढे (वय २८, रा. शिवराजनगर, रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. तो पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत होता.
उमेश लोंढे याने बी.ई. (सिव्हिल) शिक्षण घेतले असून, पागे समितीमार्फत अनुकंपा तत्त्वावर अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
तक्रारदार यांची पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा असून त्यावर त्यांनी तीन मजली इमारत बांधली आहे. या बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नसल्याने ते अनधिकृत असल्याचे नमूद करत पिंपरी-चिंचवड महापालिकेने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना नोटीस बजावली होती.
या नोटिशीविरोधात तक्रारदारांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने तक्रारदारांना नियमानुसार दंड भरून बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार तक्रारदारांनी महापालिकेकडे अर्जही दाखल केला होता. उमेश लोंढे हा पिंपळे गुरव वॉर्डातील अतिक्रमणविरोधी विभागाचा बीट निरीक्षक आहे.
त्याने ८ जून रोजी तक्रारदारांशी संपर्क साधून त्यांना भेटीस बोलावले. बांधकामाबाबत तक्रारी असून ते अनधिकृत असल्याने ते पाडावे लागेल, असे त्याने सांगितले.
त्यावेळी तक्रारदारांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखविली. मात्र, न्यायालयाचा आदेश दुर्लक्षित करून कारवाई न करण्यासाठी त्याने ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार ९ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. ११ जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता उमेश लोंढे याने ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून ७० हजार रुपये स्वीकारताना उमेश लोंढे याला रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उमेश लोंढे याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके व त्यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.
