रेड कॉर्नर नोटिसद्वारे बँकॉकहून सायबर चोरट्याला अटक
दुबई व थायलंडमधून चालवत होता आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोट्यवधी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत २०२४ पासून वॉन्टेड असलेल्या आणि दुबई व थायलंडमधून आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट चालविणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराला बँकॉक येथे अटक करून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी भारतात आणले आहे.
सौरभ ऊर्फ गणेश बाळासो काळे (वय ३१, मूळ रा. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ऑनलाईन टास्क देऊन पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवत सौरभ काळे लोकांची फसवणूक करत होता. त्याच्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो भारतातून पळून दुबईला गेला आणि तेथूनच सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवत होता.
याशिवाय, हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे आमिष दाखवून १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच २०२५ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जून २०२४ मध्ये सायबर पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. चौकशीदरम्यान दीपक गाडे हा आरोपी दुबई येथे जाऊन सौरभ काळेला भेटल्याचे समोर आले. भारतातील विविध बँक खात्यांची माहिती (एटीएम कार्ड, चेकबुक, खात्याशी लिंक असलेले मोबाईल क्रमांक, इंटरनेट बँकिंग आयडी व पासवर्ड) सौरभ काळेला पुरवून त्याबदल्यात पैसे घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सायबर फसवणुकीतील व्यवहार हाताळण्यासाठी सौरभ काळे याने दुबई येथे स्वतःचे मुख्य कार्यालयही सुरू केले होते. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यातील २०२५ मधील गुन्ह्यांमध्येही त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे भक्कम पुरावे पोलिसांना मिळाले.
त्याआधारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आरोपीच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तसेच त्याच्या प्रोव्हिजनल अरेस्टसाठीही प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर दुबईमध्ये कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच सप्टेंबर २०२४ मध्ये गणेश काळे दुबई सोडून बँकॉकला पळून गेल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली.
यानंतर सायबर पोलिसांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी करून घेतले.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयातून गणेश काळे हा थायलंडमधून अन्य देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावर तेथील सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. ११ जून रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस हवालदार हेमंत खरात आणि नितेश बिचेवार यांनी त्याचा ताबा घेतला. त्यानंतर गणेश काळेला देहूरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार दीपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने केली.
सांगलीच्या काळेचे परदेशी सायबर गुन्हेगारांशी संधान
गणेश काळे हा मूळचा सांगली जिल्ह्यातील आहे. देहूरोडमधील गुन्ह्यात त्याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर तो २०२४ मध्ये दुबईला पसार झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासात सौरभ ऊर्फ गणेश काळे हा भारतातील विविध व्यक्तींकडून बँक खाती मिळवून त्या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमधून मिळालेला पैसा स्वीकारण्यासाठी करत असल्याचे उघड झाले. आरोपीचा चीनसह इतर परदेशी नागरिकांशी थेट संपर्क होता. त्यांच्या मदतीने तो भारतीय नागरिकांना टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि डिजिटल अरेस्ट यांसारख्या विविध सायबर फसवणुकीच्या माध्यमातून गंडा घालत होता आणि मोठा आर्थिक फायदा मिळवत होता. गणेश काळे याच्या अटकेमुळे देहूरोड, हिंजवडी आणि सायबर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच नोडल सायबर पोलीस ठाणे (मुंबई), मालवणी पोलीस ठाणे (मुंबई) आणि सायबराबाद पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे अशा एकूण चार गुन्ह्यांच्या तपासालाही मदत झाली आहे.
