कार खरेदी करून देण्याच्या नावाखाली फसवणूक
डी. एस. कुलकर्णी यांच्या जप्त कार स्वस्तात देण्याचे आमिष : एजंटने अनेकांना घातला गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या बँकेकडून जप्त करण्यात आलेल्या गाड्या सोडवून स्वस्त दरात विक्री करण्याचे आमिष दाखवून कार खरेदी-विक्री करणाऱ्या एका एजंटने अनेकांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मोहसीन मोहम्मद मुल्ला (रा. अमन हाइट्स शेजारी, मोमीनपुरा, गुरुवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या एजंटचे नाव आहे. याबाबत अदनान शब्बीर शेख (वय २३, रा. नाईक बिल्डिंग, मोमीनपुरा, गुरुवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या अनेक आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. त्यापैकी काही वाहनांवरील कर्ज थकीत असल्याने संबंधित बँकांनी ती वाहने ताब्यात घेतली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अदनान शेख यांची मोहसीन मुल्ला याच्याशी लहानपणापासून ओळख होती. मोहसीन हा जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याने शेख यांना मोबाईलवर एका जुनी इनोव्हा क्रिस्टा कारचा फोटो दाखविला. ही कार चांगल्या स्थितीत असून सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर उभी असल्याचे त्याने सांगितले.
तसेच ही कार डी. एस. कुलकर्णी यांची असून, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे कोटक बँकेने ती ताब्यात घेतल्याचे सांगितले. बँकेचे थकीत कर्ज भरल्यानंतर एनओसी मिळाल्यावर कार तुमच्या नावावर करून देतो, असे आमिष दाखविले. या कारची किंमत ५ लाख रुपये ठरवून ती रक्कम आगाऊ स्वरूपात देण्यास सांगितले. त्यानुसार अदनान शेख यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये ५ लाख रुपये दिले.
यानंतर त्यांनी कारबाबत वारंवार पाठपुरावा केला असता मोहसीन मुल्ला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे संशय आल्याने शेख यांनी दिलेले पैसे परत मागितले. मात्र, त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर त्याने फिर्यादीस जीवे मारण्याची धमकीही दिली.
यानंतर शेख यांनी पैसे परत मिळविण्यासाठी त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फोन उचलणे बंद केले. परिसरात शोध घेतल्यानंतरही तो आढळून आला नाही.
दरम्यान, त्याचा शोध घेत असताना गंज पेठ परिसरातील इम्रान उस्मान सय्यद, वसीम शफिक ताजमत, अहमद सज्जाद खान तसेच इतर काही व्यक्तींनाही वाहन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन गाडी न देता फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर अदनान शेख यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे करीत आहेत.
