आर्थिक फसवणुकीमुळे उद्योजक अशोक जैन यांची आत्महत्या
१५ कोटींचा गंडा : डेक्कन पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यवसायात १५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून उद्योजक अशोक जैन यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नथुसिंह राज पुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवान राजपुरोहित आणि प्रल्हाद चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. सॅलिसबरी पार्क) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे.
त्यांच्या मुलगा मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मिनाक्षी सोसायटी, सॅलिसबरी पार्क) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना १० मे रोजी दुपारी पावणे चार ते चार वाजण्याच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरातील आपटे रोडवरील हॉटेल कोरेनेट येथे घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे बांधकाम व्यावसायिक असून ते विविध क्षेत्रांत कार्यरत होते. ‘अशोक जैन अँड असोसिएट्स’ या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वी ‘प्रचित एन्क्लेव्ह इटरनिया’सारखे प्रकल्प पूर्ण केले होते.
कोंढवा परिसरात ‘अशोक जैन प्रचित शिवम हाइट्स’ या नावाने त्यांचा नवा प्रकल्प सुरू होता. या प्रकल्पात २ आणि ३ बीएचके आलिशान फ्लॅटचे नियोजन करण्यात आले होते. डिसेंबर २०२७ पर्यंत प्रकल्पाचा ताबा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
या प्रकल्पामध्ये आरोपींनी तब्बल १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याने अशोक जैन प्रचंड मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी हॉटेल कोरेनेट येथील खोलीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अशोक जैन यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी स्वारगेट पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता ते दुचाकीवरून घराबाहेर पडल्याचे दिसून आले.
तपास करत पोलिस आपटे रोडवरील हॉटेल कोरेनेट येथे पोहोचले. संबंधित खोली आतून बंद असल्याने ती उघडण्यात आली असता अशोक जैन मृतावस्थेत आढळून आले.
१५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे मोहित जैन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करीत आहेत.
